कसा असेल चौथा टप्पा? देशात उद्यापासून नवा लॉकडाउन

मुंबईः

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्याप्रमाणे चौथा टप्पा उद्यापासून सुरू होणार आहे. लॉकडाउनच्या या काळात अनेक नियम शिथिल केले जाण्याचा अंदाज आहे. तसे संकेत मोदी यांनी आपल्या भाषणातून दिले होते. केंद्राकडून यासंदर्भातील नियमावली जारी केली जाणार आहे. लॉकडाउनचा चौथा टप्पा ३१ मे पर्यंत वाढवला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

देशातील अनेक जिल्ह्यात करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. तर काही भागात करोनाच्या परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. त्यामुळे काही राज्यांनी लॉकडाउन वाढवण्याची मागणी मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीवेळी केली होती. पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा करताना २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. त्याचबरोबर लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केली होती.

लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात कंटेनमेंट झोन वगळता रेड झोनमधील अनेक व्यवहारांना मुभा दिली जाण्याचा अंदाज आहे. जिल्ह्याची ठिकाण असलेल्या काही शहरांमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. मात्र, शहर वगळता तालुके आणि ग्रामीण भागात संसर्ग झालेला नाही, अशी स्थिती असलेल्या रेड झोनमधील जिल्ह्यांच्या बाबतही लॉकडाउनमधून शिथिलता दिली जाऊ शकते. करोनाचा उद्रेक झालेल्या शहरात लॉकडाउन कायम ठेवून उर्वरित जिल्ह्यातील व्यवहार सुरू करण्याची मूभा या टप्प्यात दिली जाऊ शकते. राज्याचे आरोग्य मंत्री यांनी याबाबतीत राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली होती.

कंटेनमेंट झोन वगळता रेड झोनसह काही प्रमाणात सार्वजनिक वाहतूक आणि रिक्षा चालवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. विशेषतः ऑनलाईन शॉपिंगसाठी दिलासा मिळू शकतो. फ्लिपकार्ट, अमेझॉन यासारख्या कंपन्यांना जीवनावश्यक नसलेल्या वस्तुंची घरपोच डिलिव्हरी करण्याची परवानगी केंद्र आणि राज्यांकडून चौथ्या टप्प्यात दिली जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button