शेतकऱ्याचा सातबारा बदलणार ! कसा असणार नवीन सातबारा ?

मुंबई : शेतकऱ्यांचा सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे सातबारा शेतकऱ्यांना कोणत्याही अनुदानाचा अथवा सुविधेचा लाभ घेण्यासाठी सातबारा उतारा ची गरज भासत असते. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांचा सातबारा बदलणार आहे.

महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं जवळपास 50 वर्षांनंतर सातबारा उताऱ्यात बदल करण्यात आले आहेत. हा नवीन स्वरुपातला सातबारा उतारा महसूल दिनापासून (1 ऑगस्ट 2021) सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं सातबारा उताऱ्यात प्रमुख 11 बदल केले आहेत.सातबारा उताऱ्यातील गाव नमुना-7 मध्ये कोणत्या व्यक्तीच्या नावावर किती जमीन आहे, याचा उल्लेख केलेला असतो, यालाच अधिकार अभिलेख असं म्हटलं जातं.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये कोणत्या पिकाची लागवड केली आहे. तर गाव नमुना-12 मध्ये या जमिनीवरच्या किती क्षेत्रावर कोणत्या पिकांची लागवड केली आहे, याची माहिती दिलेली असते, यालाच पिकांची नोंदवही असं म्हटलं जातं.

2020 मध्ये सुधारित सातबारा उताऱ्यास मंजुरी !

सप्टेंबर 2020 मध्ये सरकारनं सुधारित सातबारा उताऱ्यास मान्यता दिली. त्यानुसार सातबारा उताऱ्यात खालील बदल सूचित करण्यात आले आहेत.

लागवडी योग्य क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र स्वतंत्ररित्या दर्शवून त्यांची एकूण बेरीज करून एकूण क्षेत्र नमूद करण्यात येणार आहे.

‘गाव नमुना-7’ मध्ये गावाच्या नावासोबत गावाचा कोड क्रमांक म्हणजेच Local Government Directory टाकण्यात येणार आहे.

शेती क्षेत्रासाठी ‘हेक्टर आर चौरस मीटर’ हे एकक वापरण्यात येणार असून बिनशेती क्षेत्रासाठी ‘आर चौरस मीटर’ हे एकक वापरण्यात येणार आहे.

यापूर्वी खाते क्रमांक ‘इतर हक्क’ या रकान्यात नमूद केला जात असे. आता तो खातेदाराच्या नावासमोरच नमूद केला जाणार आहे.

जे फेरफार प्रलंबित आहेत, ते इतर हक्क रकान्यात स्वतंत्रपणे ‘प्रलंबित फेरफार’ म्हणून नोंदवण्यात येणार आहे.

यापूर्वी मयत खातेदार, कर्ज बोजे, ई-कराराच्या नोंदी कंस करून दाखवल्या जात होत्या. आता ही माहिती कंस करून त्यावर एक आडवी रेष मारून त्यांना खोडलेलं दाखवण्यात येणार आहे.

गाव नमुना-7 मधील सर्व जुने फेरफार क्रमांक आता नवीन नमुन्यात सर्वात शेवटी ‘जुने फेरफार क्रमांक’ या नवीन रकान्यात एकत्रीतरित्या दर्शवण्यात येणार आहे.

दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष काढण्यात येईल, जेणेकरूण खातेदारांची नावं स्पष्टपणे दिसतील.

गट क्रमांकाशी संबंधित शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख म्हणजेच गट क्रमांकाशी संबंधित जमिनीचा जो शेवटचा व्यवहार झाला आहे, त्याची माहिती इतर हक्क रकान्यात सगळ्यात शेवटी ‘शेवटचा फेरफार क्रमांक’ आणि दिनांक या पर्यायासमोर नमूद करण्यात येणार आहे.

बिनशेतीच्या सातबारा उताऱ्यावरील शेतजमिनीचं एकक ‘आर चौरस मीटर’ राहणार असून यात पोट खराब क्षेत्र, जुडी व विशेष आकारणी, तसंच इतर हक्कात कुळ व खंड हे रकाने वगळण्यात येणार आहेत.

बिनशेतीच्या सातबारा उताऱ्यात सगळ्यात शेवटी “सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरित झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना नंबर-12ची आवश्यकता नाही” अशी सूचना देण्यात येणार आहे.

3 मार्च 2020 ला महाराष्ट्र सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यावर वरच्या बाजूला महाराष्ट्र शासनाचा आणि ई-महाभूमी प्रकल्पाचा लोगो टाकण्यास मान्यता दिली.

सातबारा उताऱ्यातील बदलांविषयी ई-फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, “परिपूर्ण सातबारा जनतेला उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं आणि राज्यातील सगळ्या जिल्ह्यांत एकसमानता आणण्यासाठी सातबारा उताऱ्यात बदल प्रस्तावित करण्यात आले होते.

“आता नवीन सातबाऱ्याच्या माध्यमातून अधिक माहितीपूर्ण सातबारा जनतेला उपलब्ध होईल आणि महसूल विभागाच्या कामकाजात अचूकता आणि गतिमानता येईल.” अशी आशा व्यक्त केली जात आहे.

आपल्याला नवीन सातबारा उतारा पाहायला आवडेल का?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button