क्रिकेट प्रेमींना मोठा धक्का; आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा स्थगित होणार ? उद्या होणार औपचारिक घोषणा !

दुबई –

करोना व्हायरसमुळे आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा २०२२ सालापर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमधील सूत्रांनी सांगितले की, सध्याची परिस्थिती आणि अडचणी लक्षात घेता बोर्डाच्या सदस्यांकडून २८ तारखेला होणाऱ्या बैठकीत याची औपचारिक घोषणा केली जाऊ शकते. आयसीसीने असा निर्णय घेतला तर आयपीएल २०२०चा मार्ग मोकळा होऊ शकतो.ऑस्ट्रेलियात यावर्षाच्या अखेरीस होणारी आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा स्थगित होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

जर भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये आयपीएल स्पर्धा झाली आणि पुढील वर्षी एप्रिलमध्ये २०२१ वर्ल्ड कप झाला तर दोन वर्ल्डकपचे प्रसारण शक्य करणे शक्य होणार नाही, असे स्टार स्पोर्ट्समधील सूत्रांनी सांगितले.

ज्या प्रमाणे जपानमध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली त्याच प्रमाणे टी-२० क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलण्यात येणार आहे. पण ही स्पर्धा पुढील वर्षी घेता येणार नाही. कारण भारतात टी-२० वर्ल्ड कप नियोजित आहे. एका वर्षात दोन टी-२० वर्ल्ड कप खेळवणे योग्य ठरणार नाही. त्याच बरोबर अशा प्रकारे दोन स्पर्धा खेळवण्यास ब्रॉडकास्टर आणि क्रिकेट बोर्ड देखील होकार देणार नाहीत.

चर्चा तर होणार ?

आयसीसी बोर्ड भारतात पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप संदर्भात चर्चा करू शकते. ही स्पर्धा वगळण्याबाबत बोर्डाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. लॉकडाऊनमुळे बीसीसीआयने यावर निर्णय घेण्यासाठी वेळ मागितला आहे. याबाबत सरकारचे धोरण जाणून घेतल्यानंतर बीसीसीआय निर्णय घेऊ शकते. त्याच बरोबर आयसीसीच्या नव्या अध्यक्षाबाबत निर्णय होऊ शकतो. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष कोलिन ग्रेव्स या पदाचे दावेदार मानले जातात. त्याच बरोबर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली देखील स्पर्धेत आहेत.

गांगुली पाठिंबा देणार का?

टी-२० वर्ल्ड कप २०२२पर्यंत पुढे ढकलण्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली पाठिंबा देऊ शकतात. २०२३ साली भारतात वनडे वर्ल्ड कप होणार आहे. असा परिस्थितीत ३ वर्षात ३ वर्ल्ड कप होतील. यात आयपीएलचे आयोजन देखील होऊ शकते.

जर वर्ल्ड कप पुढे ढकलला तर आगामी महिन्यात द्विपक्षीय मालिका होऊ शकतात. हा मुद्दा फक्त सदस्य देशांचा नाही तर स्टार स्पोर्ट्सचा देखील आहे. स्टारकडे आयसीसीच्या स्पर्धांसह बीसीसीआय आणि आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क आहेत.(सैजन्य – मटा)

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button