breadcrumb-details

एकटा जडेजा लढला; सामन्यासह भारताने मालिका गमावली!

Gallery

एकटा जडेजा लढला; सामन्यासह भारताने मालिका गमावली!

वेगवान न्यूज नेटवर्क
08 February 2020 07:24 PM

ऑकलंड:

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा २२ धावांनी पराभव झाला. यासह भारतीय संघाने ३ सामन्यांची मालिका देखील गमावली. आघाडी आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यानंतर रविंद्र जडेजा भारताच्या विजयासाठी संघर्ष केला पण त्याला यश आले नाही. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी २७४ धावांचे आव्हान ठेवले होते. पण भारताचा डाव २५१ धावांवर संपुष्ठात आला. भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याचा Live स्कोअरकार्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

न्यूझीलंडने दिलेल्या २७४ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. दोन्ही सलामीवीर झटपट बाद झाले. त्यानंतर विराट कोहली देखील १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर संपूर्ण दौऱ्यात शानदार कामगिरी करणारा केएल राहुल देखील ४ धावांवर बाद झाला. पाठोपाठ केदार जाधव ९ धावांवर माघारी परतला. केदार बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ५ बाद ९६ अशी होती.

 

भारताचा मोठा पराभव होईल असे वाटत असताना श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी करून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण खराब शॉर्ट खेळून तो ५० धावांवर बाद झाला. अखेरच्या १० षटकात रविंद्र जडेजाने शानदार खेळी करत संघाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. त्याने नवदीप सैनीसह आठव्या विकेटसाठी ७६ धावांची भागिदारी केली. सैनीने ४५ धावा केल्या. त्यानंतर देखील जडेजाने त्याचा संघर्ष सुरु ठेवला. पण ४९व्या षटकात तो बाद झाला. जडेजाने ७३ चेंडूत १ षटकार आणि २ चौकारांसह ५५ धावा केल्या.

 

आधी ऑकलंड येथील ईडन पार्कवर भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने शानदार सुरूवात केली. मार्टिन गप्टिल आणि हेन्री निकोलस यांनी पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागिदारी केली. चहलने निकोलस याला ४१ धावांवर बाद कर भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर गप्टिल आणि ब्लंडेल यांनी संघाला १५०च्या जवळ पोहोचवले. तेव्हाच ब्लंडेलला शार्दुलने बाद केले. त्यानंतर एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात गप्टिल धावाबाद झाला. त्याने ७९ धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडचा डाव कोसळण्यास सुरुवात झाली. गप्टिल बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची अवस्था ३ बाद १५७ अशी होती. त्यानंतर भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी न्यूझीलंडची अवस्था ८ बाद १९७ अशी केली.

 

अखेरच्या षटकात रॉस टेलर आक्रमक खेळ केला त्याला काईल जेमीसन चांगली साथ दिली. टेलरने नाबाद ७३ धावा केल्या. टेलर-जेमीसन जोडीने नवव्या विकेटसाठी नाबाद ७६ धावांची भागीदारी केली. ऑकलंड मैदानावर आणि न्यूझीलंडकडून नवव्या विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी ठरली.भारताकडून यजुवेंद्र चहलने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने २ आणि रविंद्र जडेजाने एक विकेट घेतली.