breadcrumb-details

आपल्या घरी लहान मुल आहे तर हा गुणकारी ओवा द्या

Gallery

आपल्या घरी लहान मुल आहे तर हा गुणकारी ओवा द्या

वेगवान न्यूज नेटवर्क
05 January 2020 11:58 AM


ओवा हा पुष्कळ औषधी गुण असणारा पदार्थ आहे. आपल्याकडे अनेक तऱ्हेचे मसाले आपण स्वयंपाकामध्ये वापरतो. त्याच मसाल्याच्या पदार्थांमध्ये ओव्याचा ही समावेश आहे. ओव्याचा वापर स्वयंपाकाबरोबर, अनेक आयुर्वेदीक उपचार पद्धतींमध्ये ही केला गेला आहे. लहान, मोठे आणि वयस्क, सर्वांनाच याच्या पासून लाभ मिळतो. विशेषकरून लहान मुलांच्या तब्येतीच्या तक्रारींवर ओवा विशेष गुणकारी आहे. ओव्यामध्ये असलेले थायमॉल हे तत्व पचनक्रिया सुधारणारे आहे. या शिवाय ही ओव्याचे बरेच फायदे आहेत.

ओव्यामध्ये असलेले थायमॉल लहान मुलांच्या सर्दी आणि खोकल्यावर अतिशय गुणकारी आहे. घरातील लहान मूल सर्दी किंवा खोकल्याने आजारी असता, दोन मोठे चमचे ओवा तव्यावर कोरडाच भाजून घ्यावा. हा भाजेलेला ओवा एका स्वच्छ, मऊ कपड्यात बांधून त्या पुरचुंडीने मुलाची पाठ व छाती शेकून काढावी. या मुळे जर सर्दीने नाक बंद झाले असेल, तर ते ही मोकळे होऊन आराम मिळतो.

सर्दी झाली असता ओव्याच्या तेलाने लहान मुलांची मालिश केली असता, सर्दीपासून आराम मिळण्यास मदत होते. ओव्याचे तेल बनविण्यासाठी एक मोठा चमचा तिळाच्या तेलामध्ये, एक मोठा चमचा ओवा घालून हे तेल गरम करून घ्यावे. तेल थोडे थंड झाल्यानंतर या तेलाने मुलाच्या छातीवर व पाठीवर मालिश करावी.

ओव्याचा काढा घेतल्याने सर्दी खोकला तर बरा होतोच, शिवाय पचनक्रिया ही सुधारते. हा काढा बनविण्याकरिता पाव कप गूळ, अर्धा कप पाणी, एक लहान चमचा ओवा, अर्धा लहान चमचा हळद, एक लवंग आणि पाच काळी मिरी एका भांड्यामध्ये एकत्र करून दहा मिनिटे उकळून घ्यावे. हा काढा गाळून घ्यावा आणि आवश्यकतेनुसार मुलाला एक – एक चमचा पाजावा.

प्रसूतीनंतर नवजात अर्भकाला स्तनपान कराविणाऱ्या मातेने ओव्याचे सेवन केल्यास तान्ह्या बाळाला गॅसेस सारख्या विकारांचा त्रास उद्भवत नाही. त्यामुळे प्रसूतीनंतर बाळंत स्त्रीला ओवा घालून उकळविलेले पाणी प्यायला देण्याची पद्धत फार पूर्वीपासून चालत आली आहे. काही लहान मुलाना माती खायची सवय असते. रोज रात्री ओव्याचे चूर्ण दिल्यास ही सवय सुटण्यास मदत होते.


 
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी वेगवान न्यूज घेत नाही