breadcrumb-details

जम्मू-काश्मीरचे सफरचंद देवळ्यात बहरले, वाजगाव येथील शेतकऱ्याचा सफरचंद लागवडीचा प्रयोग अंशतः यशस्वी

Gallery

जम्मू-काश्मीरचे सफरचंद देवळ्यात बहरले, वाजगाव येथील शेतकऱ्याचा सफरचंद लागवडीचा प्रयोग अंशतः यशस्वी

वेगवान न्युज / राजपाल अहिरे
14 July 2020 08:32 PM

देवळा (नाशिक ) : वैविध्यपूर्ण भौगोलिक रचना व हवामानाने नटलेल्या नाशिक जिल्ह्याची ओळख भविष्यात द्राक्षांबरोबरच सफरचंद उत्पादनासाठी झाली तर यात कोणतेही नवल असणार नाही. कारण, देवळा तालुक्यातील वाजगाव येथील शेतकरी बाळासाहेब देवरे यांनी आपल्या शेतीत केलेल्या सफरचंद लागवडीचा अभिनव प्रयोग काही अंशी यशस्वी झाला असून जम्मूकाश्मीर च्या सफरचंदाला वाजगाव येथे आलेला बहर बघण्यासाठी परिसरातील शेतकरी गर्दी करत आहेत. वाजगाव येथील देवरे कुटुंबीय प्रयोगशील शेतकरी म्हणून महाराष्ट्रभर परिचित आहेत.

त्यांच्या शेतीला भेट देण्यासाठी राज्य व परराज्यातील अनेक शेतकरी अभ्यास दौरे करत असतात. त्यांची एकूण ७० एकर शेती असून सहा भावांचे एकत्रित कुटुंब आहे. विविध फळ पिकांची लागवड करून यशस्वी उत्पादन घेण्याचा त्यांचा ध्यास असतो. यापूर्वी त्यांनी ३५ एकर क्षेत्रावर आंबा, नारळ, पेरू, सीताफळ, डाळिंब व द्राक्ष फळपिके घेतली आहेत. मागील वर्षी त्यांनी सफरचंद पिकाच्या लागवडीचा प्रयोग केला आहे. जून २०१९ मध्ये जम्मू येथील हरमन ९९ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जातीची रोपे त्यांनी मध्यस्थांकडून आणली. त्यांची १० बाय १० फूट अंतरावर लागवड केली. मध्यंतरीच्या काळात काही झाडे वाळली. सध्या बागेत सुमारे दोनशे झाडे आहेत. लागवडीसाठी ही कलम रोपे जम्मू भागातून विमानाद्वारे नाशिकला आणण्यात आली होती. त्यानंतर लागवडीसाठी शेणखत, निंबोळी पेंड, सिंगल सुपर फॉस्फेट यांचा वापर करून खड्डा भरण्यात आला होता.

पीक संरक्षणासाठी जैविक कीटकनाशकांचा वापर करण्यात आला आहे. लागवडीपश्चात दोन वर्षांनंतर फळधारणा अपेक्षित असल्याचे देवरे यांना सांगण्यात आले होते. मात्र, एक वर्षानंतर तुरळक झाडांना एक, दोन ते तीन या प्रमाणात फळधारणा दिसून आली आहे. फळधारणेसाठी कुठल्याही प्रकारचे रासायनिक औषधे फवारणी किंवा छाटणी केलेली नसताना नैसर्गिक पणे झाडांना फळधारणा झाल्याने भविष्यात योग्य अभ्यास करून भरघोस उत्पन्नासाठी प्रयत्न केल्यास मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळू शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचे हवामान अनोळखी असलेल्या सफरचंद लागवडीत पोषक असल्याचे सिद्ध झाले आहे.

भविष्यात द्राक्ष बरोबरच सफरचंदा साठी ही नाशिकचे नाव घेतले गेल्यास त्यात कोणतीही नवल नाही. लागवडीचे टप्पे एप्रिल २०१९ : कलम रोपांसाठी श्रीनगर (काश्मीर) येथे फलोत्पादन रोपवाटिकेत नोंदणी जून २०१९ : रोपांची उपलब्धता झाल्यानंतर लागवड जुलै २०२० : काही प्रमाणात फळधारणा ] महत्वाचे : मे २०२० अखेर कडक ऊन असताना पाने व शेंडे काही प्रमाणात पिवळी पडली. यामध्ये फेरसटी कमतरता दिसून आली. मात्र त्यानंतर फेरस सल्फेट व मॅग्नेशिअम सल्फेट देऊन पिवळी पाने कमी करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा दिल्यानंतर प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला. रोग व किडीचा अद्याप प्रादुर्भाव नाही. नत्र उपलब्धता व सुपीकतेसाठी हिरवळीचे खत म्हणून तागाची पेरणी केली आहे. त्यातून गरजेनुसार नत्राची उपलब्धता झाली आहे. सुरुवातीला आलेल्या फळांचा रंग गडद गुलाबी व हलकासा पिवळा. मध्यम आकाराचे व अजून पूर्ण पक्व न झालेले फळ चवीसाठी तोडले असता ते रवेदार व मध्यम गोड. हा प्रयोग असल्याने काही निष्कर्ष तपासणी सुरू आहे. प्रतिक्रिया : पारंपरिक शेती न करता फळबाग लागवडीचे प्रयोग आम्ही नेहमीच करत असतो. वर्षभरापूर्वी सफरचंद लागवडीचा प्रयोग केला आहे. त्यास फळधारणा झाल्याने आमच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य संगोपन करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणार आहोत. बाळासाहेब देवरे, शेतकरी, वाजगाव, जि. नाशिक