breadcrumb-details

उन्हाळी कांद्याच्या दरात घसरण सुरूच...

Gallery

उन्हाळी कांद्याच्या दरात घसरण सुरूच...

वेगवान न्यूज / समीर पठाण
05 August 2020 09:09 AM

लासलगाव l

आशिया खंडातील कांद्याची महत्वाची बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याच्या दरात घसरण सुरूच असून कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च वसूल होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.सध्या नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. मंगळवारी लासलगाव बाजार समितीत ९०० वाहनातून १२५०० क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होऊन बाजार भाव कमीत कमी ४०० रु,जास्तीत जास्त ९५१ रु तर सरासरी ७०० रु प्रती क्विंटल भाव मिळाला आहे
  
कोरोनामुळे कांद्याला घरगुती वापराशिवाय अद्यापही इतर व्यवसायीक मागणी नाही.कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे बाजारसमित्याही चालू-बंद राहत असून कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अस्मानी,सुल्तानी संकटाने हतबल झाला आहे.यंदा कोरोना महामारीने शेतकर्‍यांच्या कोणत्याच शेतमालाला अपेक्षित भाव मिळालेला नाही.कोरोना काळात जगण्याची धडपड करत शेतकरी अर्थाजनासाठी रस्त्यावर आला,मात्र यातूनही खर्चही फिटेल इतकेही उत्पन्न बळीराजाला मिळाले नाही. लॉकडाऊन व संचारबंदीच्या फटक्यातून अजूनही शेतकरीवर्ग सावरलेला नाही. सध्या अनलॉक टप्पा सुरू असला तरी,सर्वच छोट्या-मोठ्या शहरातील हॉटेल्स,ढाबे बंद आहेत,तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही अद्याप सुरळीत झालेली नाही.

भविष्यात अशीच परिस्थिती कायम राहिली तर कांदा टिकेल व कांद्याला चांगला भाव मिळेल याची शाश्‍वती राहिलेली नाही.यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाले आहे. कर्नाटक,आंध्र आदी राज्यांमध्ये कांद्याची सर्वात अगोदर लागवड होते.साधारणत:ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्या दरम्यान परराज्यातील माल बाजारात आला तर आपल्याकडील कांद्याचे भाव वाढण्याची शक्यताच धूसर असल्याचे मत कांदा क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.यंदा सर्वत्र उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे.कोरोनामुळे कांद्याच्या मागणीत घट निर्माण झाल्याने उत्पादकांसह संबंधित घटकांना त्याचा मोठा फटका बसत असल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरू करून निर्यातीला चालना देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.