breadcrumb-details

संजय राऊत पुन्हा अडचणींत ; कंगनाला उच्च न्यायालयाची प्रतिवादी करण्याची परवानगी

Gallery

संजय राऊत पुन्हा अडचणींत ; कंगनाला उच्च न्यायालयाची प्रतिवादी करण्याची परवानगी

वेगवान न्यूज नेटवर्क
23 September 2020 08:54 AM

मुंबई l मुंबई महापालिकेने पाली हिल येथील बंगल्यातील कथित अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याने अभिनेत्री कंगना रनौत हिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये शिवसेनेचे मुख्य प्रवक्ता, खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची परवानगी उच्च न्यायालयाने कंगनाला मंगळवारी दिली.

तसेच पालिकेच्या एच/पश्चिम प्रभागाचे अधिकारी भगवंत लाटे यांनाही प्रतिवादी करण्याची मुभा दिली.
पालिकेने केलेली कारवाई बेकायदेशीर आहे. त्यामुळे पालिकेला व संबंधित अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी कंगनाने याचिकेत केली आहे.

या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. जे. काथावाला व न्या. आर. आय. छागला यांच्या खंडपीठापुढे होती. कंगनातर्फे ज्येष्ठ वकील बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयात एक डीव्हीडी सादर केली. 

त्यात खासदार संजय राऊत यांचे एक भाषण रेकॉर्ड केलेले आहे. त्या भाषणात राऊत यांनी कंगनाला धमकी दिल्याचा दावा वकिलांनी केला.या डीव्हीडीचा आधार घेऊन अर्जदार युक्तिवाद करणार असेल, तर याचिकेमध्ये संजय राऊत यांनाही प्रतिवादी करणे आवश्यक आहे. कारण त्यांनाही बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी, असे न्यायालयाने म्हटले.

त्यांना बाजू मांडू द्या...
'मी हे विधान केलेच नाही आणि डीव्हीडी बनावट आहे, असे राऊत यांनी म्हटले तर? तुम्ही त्यांना बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे,' असे न्यायालयाने म्हटले.