breadcrumb-details

येवला तालुक्यातील बळीराजाचा हाता-तोंडाशी आलेला घास पाण्यात!

Gallery

येवला तालुक्यातील बळीराजाचा हाता-तोंडाशी आलेला घास पाण्यात!

वेगवान न्यूज / एकनाथ भालेराव
25 September 2020 08:59 AM

येवला - येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात समाधानकारक पावसाने अन् शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने फुलवलेल्या शेतशिवारावर अस्मानी संकटाने कहर केला आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे डोळ्यांदेखत परतीच्या मुसळधार पावसाने नुकसान होताना पाहण्याचे दुर्भाग्य शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे. 

गेल्या दहा-पंधरा दिवसापासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे शेतक-यांच्या खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. मोठ्या  प्रमाणावर मका,कांदा,कपाशी बाजरी,भुईमूग आदी लागवड केलेल्या पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. यावर्षी परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरला असून तालुक्यात विविध ठिकाणी जोरदार अतिवृष्टी होत  आहे.शेतात काढून पडलेली बाजरी तसेच आता काढणीला आलेले  मका,भुईमूग, व उडीद पिकांचे नुकसान झाले आहे.

पाऊस झाल्याने शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांच्या चाळीत उन्हाळ कांदा शिल्लक आहे, तो आता सातत्याने होणारा पाऊस व उकाडा यामुळे खराब होण्यास सुरुवात झाली आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे उन्हाळ कांद्याचे बी टाकण्यास उशीर होत आहे.

येवला तालुक्यात परतीच्या पावसाने ओल्या दुष्काळाची शेतकरी भीती व्यक्त करीत आहेत. कांदा रोपे,पोळ कांदा, मका, बाजरी, कापूस अशा सर्वच पिकांना फटका बसला आहे. पिके गेल्या आठ-दहा  दिवसांपासून पाण्यात आहेत. कापणी केलेली बाजरी पाण्यात भिजत आहे.शेती उफळली आहे.कांदा रोपे पूर्ण पणे बसली आहे तर लागवड केलेला पोळ कांदा स्प्रिंग होऊन जमिनीवर लोळत आहे.तर वाफ्यांमधील 40-70 % कांदा नष्टच झाला आहे. 

परतीच्या पावसाने सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुगाचे उत्पादन तर हातचे गेले आहे. मका पीक अमेरिकन लष्करी अळीने केव्हाच नष्ट केले आहे. कपाशी हे मुख्य पीक असल्याने परतीच्या पावसाचा जोर अधिक आहे. यामुळे कपाशीला लागलेली बोंडे झडत आहे. कपाशीचेही नुकसान झाले आहे. अद्यापही अनेक शेतांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे.तर अनेक शेतातून  पाण्याचा प्रवाह चालू आहे.जमिनीला जणू संपूर्ण पाझर फुटला आहे.