ठाकरे सरकार संजय राऊतांना समज द्या; काँग्रेस ठाकरे सरकारवर नाराज?

मुंबई: कोरोना परिस्थिती हाताळताना अगोदरच मेटाकुटीस आलेल्या ठाकरे सरकारला आता काँग्रेसने आणखी एक इशारा दिला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्पष्टपणे बोलून दाखवल्याची माहिती, एका वृत्तवाहिनीच्या सूत्रांना मिळाली आहे.
अंबानी स्फोटक प्रकरणात पोलीस दलापर्यंत पोहोचलेल्या धाग्यादोऱ्यांमुळे झालेली नाचक्कीच आहे.या माहितीनुसार, काँग्रेसने सचिन वाझे प्रकरणात आमची नाहक बदनामी झाली, असे मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे समजते. हे प्रकरण सरकारने व्यवस्थितपणे हाताळले नाही.
त्यामुळे आमच्यावरही विनाकारण शिंतोडे उडाले, असा नाराजीचा सूर काँग्रेसच्या नेत्यांनी लावला.तर दुसरीकडे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) अध्यक्षपदासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून सुरु लॉबिंगविषयीही काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. संजय राऊत यांनी यूपीएचे अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याऐवजी शरद पवार यांच्याकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी लावून धरली आहे.
या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमकीही झाल्या आहेत. नाना पटोले यांनी आम्ही हा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडणार असल्याचेही सांगितले होते. त्यामुळे आता शिवसेनेने संजय राऊत यांनी समज द्यावी, अशी मागणीही काँग्रेस नेत्यांनी केल्याचे समजते.